अहिल्यानगर जिल्हाशेवगाव तालुका

बोधेगावच्या ग्रामसेवकाने घातला 41.25 लाखांचा गंडा; शेअर मार्केट फसवणुकीप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

शेवगाव : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 41 लाख 25 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात ग्रामसेवक उद्धव जाधोर यांच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शेवगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी रवींद्र वाबळे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत संबंधितांकडे विविध व्यक्तींनी रक्कम दिली होती. यामध्ये रवींद्र वाबळे यांचे 13 लाख 75 हजार रुपये, श्रीकृष्ण खटावकर यांचे 12 लाख 50 हजार रुपये, तर मनीषा पाठक यांचे 15 लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व रकमेची एकूण किंमत 41 लाख 25 हजार रुपये आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, उद्धव जाधोर हे बोधेगाव येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक असल्याचाही उल्लेख आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली संबंधितांकडून रक्कम स्वीकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्याद प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर शेवगाव पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आर्थिक व्यवहार कोणत्या माध्यमातून झाले, गुंतवणुकीच्या नावाखाली नेमकी कोणती आश्वासने देण्यात आली, रक्कम कुठे वळविण्यात आली आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, शेवगाव, पाथर्डी, पैठण आणि नेवासा परिसरातील आणखी काही व्यक्तींचीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची पोलिस तपासात पडताळणी होणार आहे.अशाच प्रकारे आपलीही आर्थिक फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी पुढे येऊन शेवगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि आर्थिक व्यवहारांची संपूर्ण वस्तुस्थिती पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!