अहिल्यानगर जिल्हासंजीवनी विद्यापीठ

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती साकार करावीत; बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे महत्वाचे – डॉ. मनालीताई कोल्हे य

संजीवनीच्या चित्रकला स्पर्धेत १४५१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

कोपरगाव – विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक शिक्षक आणि आई-वडील असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शन आणि अनुभवाचे बोल मनापासून ऐकले पाहिजेत. मोठी स्वप्ने पाहा आणि ती साकार करून आई-वडिलांसह शाळेचेही नाव मोठे करा. आजचे युग कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे बदल स्वीकारण्याची आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित केली पाहिजे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बदलांशी जुळवून घेणे महत्त्वाचे असून, यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यामुळे मेहनतीला पर्याय नाही, असे प्रतिपादन संजीवनीच्या संचालिका डॉ. मनालीताई कोल्हे यांनी केले.

संजीवनी युनिव्हर्सिटी आणि संजीवनी वुमन एम्पॉवरमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला तब्बल १४५१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बक्षीस वितरणप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. मनालीताई कोल्हे बोलत होत्या. यावेळी वुमन एम्पॉवरमेंट सेलच्या अध्यक्षा डॉ. सोनाली चिने, उपाध्यक्षा डॉ. अश्विनी जमदाडे, डीन डॉ. सरिता पवार, विभागप्रमुख डॉ. माधुरी जावळे, डॉ. मोहिनी गुंजाळ, प्रा. वृंदा कोऱ्हाळकर, डॉ. शाहीन पठाण आदी उपस्थित होते.

यावेळी नितीनदादा कोल्हे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक क्षमता आणि कलागुणांची कमतरता नाही. मात्र, हे गुण सादर करण्यासाठी त्यांना योग्य व्यासपीठ आणि संधी मिळणे आवश्यक आहे. चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे दर्शन घडविण्याची संधी मिळाली आहे. स्पर्धांमधूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यश-अपयशाची चिंता न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रत्येक स्पर्धेकडे शिकण्याची आणि स्वतःला घडविण्याची संधी म्हणून पाहावे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यात शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्या कार्याचेही मनापासून अभिनंदन करतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत पुढे नेण्यासाठी संजीवनी सदैव त्यांच्या पाठीशी आहे.

इयत्ता ७ वी ते ८ वी गटासाठी ‘निसर्ग वाचवा, भविष्य वाचवा’, ‘माझी शाळा, माझा अभिमान’, ‘पाणी आहे तर जीवन आहे’, ‘स्वच्छ सुंदर भारत’, ‘विज्ञान आणि माझे भविष्य’, ‘प्लास्टिकमुक्त भारत’ आणि ‘संजीवनी’ हे विषय देण्यात आले होते. या गटात प्रथम क्रमांक स्वरूप मांढरे, द्वितीय राजनंदिनी शिंदे तर तृतीय क्रमांक ओजस्विनी नरोडे हिने मिळविला. उत्तेजनार्थ सौमया वर्मा, ईश्वरी हांडे, विव्हान मोरे, वेदांती कर्पे आणि अंजली गुडघे यांची निवड करण्यात आली.

इयत्ता ९ वी ते १२ वी गटासाठी ‘भारत २०४७ : माझ्या स्वप्नातील भारत’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : मानवाचा मित्र की भविष्याचे आव्हान?’, ‘युवा शक्ती-राष्ट्राची शक्ती’, ‘मानवता आणि तंत्रज्ञान’, ‘डिजिटल युगातील विद्यार्थी’, ‘सायबर सुरक्षितता-सुरक्षित डिजिटल भविष्य’ आणि ‘संजीवनी’ हे विषय देण्यात आले होते. या गटात प्रथम दर्शना शिंदे, द्वितीय अंकिता रेपाळे, तर तृतीय क्रमांक विवेकानंद सुतार आणि तनिष्का परजणे यांनी मिळविला. उत्तेजनार्थ श्रेया भंडारी, प्रणव शिंगारे, तरुणन्नम पिंजारी, स्वरा देशमुख आणि अलकानंद निरगुडे यांची निवड करण्यात आली.

दोन्ही गटांतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये रोख, मानपत्र व प्रमाणपत्र देण्यात आले. उत्तेजनार्थ विजेत्यांना ५०० रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात आले. दरम्यान, नितीनदादा कोल्हे यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन स्पर्धकांचे मनोबल वाढविले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे व व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकूर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!