
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटकवर्क)
अहिल्यानगर – सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन सरसकट खरीप पिकांसाठी एकरी ५० हजार रुपये, तर ऊस व फळबागांसाठी एकरी एक लाख रुपये दुष्काळ निधी तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावा, अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले असतानाही शेतकऱ्यांकडून अनेक कागदपत्रे गोळा केली जात आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांचे पीक पाहणीचे फोटो ॲपमध्ये दाखवत नसल्याने ई-पिक पाहणी पूर्ण होत नाही. महसूल व कृषी विभागाकडे शेतकऱ्यांच्या पिकांची माहिती व डाटा उपलब्ध असतानाही विनाकारण शेतकऱ्यांची ससेहोलपट सुरू असल्याचे शेळके यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्याप्रमाणे सरसकट खरीप पिकांसाठी एकरी ५० हजार रुपये दुष्काळ निधी द्यावा. तसेच दुष्काळामुळे ऊस व फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यासाठी एकरी एक लाख रुपये मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, सरकारने जनावरांसाठी चारा स्वरूपात मदत उपलब्ध करून द्यावी. या दुष्काळामुळे शेतकरी किमान तीन वर्षे तग धरू शकणार नाही, त्यामुळे शासनाने तातडीने ठोस आर्थिक मदत जाहीर करणे आवश्यक असल्याचे शेळके यांनी पत्रकात म्हटले आहे.
शेतमजुरांनाही दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. शेतात कामे उपलब्ध नसल्याने शेतमजुरांच्या हाताला रोजगार राहिलेला नाही. त्यामुळे शासनाने रोजगार हमी योजनेंतर्गत तातडीने कामे सुरू करून शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही विठ्ठलराव शेळके यांनी केली आहे.



