अहिल्यानगर जिल्हाराहाता तालुका

राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्रीडा स्पर्धांना लोणीत उत्साहात प्रारंभ

संघभावना, संयम आणि परिश्रमातून यश निश्चित : भिमराज दराडे

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

प्रतिनिधी-शंकर सोनवणे

 

लोणी : जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व असून, खेळामुळे शारीरिक आरोग्यासोबतच मनातील उर्मी आणि ऊर्जा सकारात्मक पद्धतीने व्यक्त होण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्यासोबतच संघभावना, संयम आणि परिश्रमाची कास धरावी. डॉक्टरांनी स्वतःचे आरोग्य जपले, तरच ते समाजातील इतरांच्या आरोग्याची प्रभावीपणे सेवा करू शकतील. संघभावनेने आणि सातत्यपूर्ण परिश्रमाने यश हमखास मिळते, असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी केले.

प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी या प्रवरा अभिमत विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय महाविद्यालयांच्या क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे विश्वस्त ध्रुव विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे, अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सुनील बुलार, क्रीडा शिक्षक नितीन गोर्डे आदी उपस्थित होते.

दराडे म्हणाले, प्रवरा परिसराला सहकाराचा समृद्ध वारसा लाभला आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या दूरदृष्टीतून सहकाराच्या माध्यमातून या परिसराचा मोठा कायापालट झाला. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाच्या क्षेत्रात प्रवरेने निर्माण केलेले योगदान उल्लेखनीय आहे. प्रवरा परिसरातील आरोग्यसेवा सुविधा अत्याधुनिक आणि प्रगत असून, कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या अथक परिश्रमातून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे एक महत्त्वाचे आरोग्यसेवा केंद्र म्हणून विकसित झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर भिमराज दराडे यांनी क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनाची घोषणा केली. विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील ३५ संघ दाखल झाले असून एकूण ४०० खेळाडूंच्या सहभागामुळे परिसरात क्रीडा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिपेश खाबीया यांनी सुत्रसंचलन केले तर रीया छल्लानी यांनी आभार मानले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!