अहिल्यानगर जिल्हासंगमनेर तालुका

चक्क पोलिसाच्या शेतातील बाजरीच्या कणसांवर जादूटोणा; संगमनेर तालुक्यात एकावर गुन्हा दाखल

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

संगमनेर – तालुक्याच्या पठारभागातील शेळकेवाडी शिवारात शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांजवळ लिंबू, कवड्या, बिब्बे, घोंगडीचे केस तसेच अन्य संशयास्पद वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या वस्तू कुटुंबावर जादूटोणा करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा संशय व्यक्त करीत महिलेने घारगाव पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ज्योती बाळासाहेब कडू यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे पती मुंबई येथे पोलीस सेवेत असून, त्या दोन मुलींसह शेतावरील वस्तीवर राहतात. त्यांच्या शेजारी मंगेश सुभाष गोंदके यांची शेती व घर आहे. यापूर्वी शेतातील वालवडीचे नुकसान झाल्याचे तसेच काही महिन्यांपूर्वी वापरातील कपडे चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, गुरुवारी पहाटे सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कुत्रे जोरात भुंकत असल्याने ज्योती कडू यांनी खिडकीतून बाहेर पाहिले. त्यावेळी मंगेश गोंदके हा त्यांच्या शेतात वाळत घातलेल्या बाजरीच्या कणसांजवळ बसलेला दिसला. कडू यांनी बहीण, दाजी व भाच्याला आवाज दिल्यानंतर संबंधित व्यक्ती शेतातून पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर नातेवाईकांसह घटनास्थळी पाहणी केली असता बाजरीच्या कणसांजवळ लिंबू, कवड्या, बिब्बे, घोंगडीचे केस व अन्य संशयास्पद वस्तू आढळून आल्या. या वस्तू जाणीवपूर्वक ठेवण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला असून, त्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वीही शेतातील वालवडीचे नुकसान आणि घरातील वापरातील कपडे चोरीला गेल्याचा संशय असल्याने कुटुंबीयांमध्ये संबंधित व्यक्तीबाबत संशय निर्माण झाला होता. मात्र, जादूटोण्याचा आरोप हा फिर्यादीतील दावा असून, त्याची सत्यता पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.या प्रकरणी मंगेश सुभाष गोंदके याच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहेत.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!