
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
राहाता – राहाता तालुक्यातील जळगाव शिवारातील शिनगारे वस्ती नजीक बिबट्याने पुन्हा धुडगूस घातला असून, ३ ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अजिंक्य हरगुडे यांच्या घराजवळ बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. बिबट्याने शेळीला घरापासून सुमारे शंभर ते दीडशे फूट अंतरावर फरफटत नेऊन ठार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेची माहिती चितळीचे लोकनियुक्त सरपंच नारायणराव कदम यांनी कोपरगाव वन विभागाच्या वनरक्षक सविता थोरात यांना दिली. वन विभागाकडून घटनास्थळी पाहणी करून शेळीच्या मृत्यूचा पंचनामा करण्यात येणार आहे.
पहाटे शेळीचा ओरडण्याचा आवाज आल्याने अजिंक्य हरगुडे यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता, बिबट्याne खुटी उपटून शेळीला फरफटत घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.बिबट्याने शेळीला घरापासून शंभर ते दीडशे फूट अंतरावर फरफटत नेले आणि तेथेच तिच्या नरडीचा घोट घेतला. हरगुडे कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने शेळीला तिथेच सोडून धूम ठोकली.या हल्ल्यात तीन महिन्यांची गाभण शेळी मृत्युमुखी पडली. घरापासून हाकेच्या अंतरावर बिबट्याने केलेल्या या हल्ल्यामुळे हरगुडे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील वर्षभरापासून बिबट्यांचा धुमाकूळ
मागील वर्षभरात जळगाव शिवारात विविध पशुधनांवर बिबट्यांकडून हल्ले झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.वारंवार पशुधनांवर हल्ले होऊनही बिबटे अद्याप वन विभागाकडून जेरबंद झालेले नसल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. बिबट्यांचा वावर सातत्याने लोकवस्तीजवळ दिसून येत असल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
जळगाव शिवारात भक्ष्याच्या शोधात बिबटे सातत्याने लोकवस्तीकडे येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे रात्री तसेच पहाटेच्या वेळी शेतकरी आणि पशुपालकांना घराबाहेर पडताना भीती वाटत आहे.सध्या सर्वत्र दुष्काळाचे सावट असून शेतकरी आधीच चिंतेत आहेत. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि आर्थिक अडचणींचा सामना करत असताना पशुधनावर बिबट्यांचे हल्ले वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
जळगाव शिवारातील शिनगारे वस्ती नजीक बिबट्याचा वाढता वावर आणि मागील वर्षभरातील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना करून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी अजिंक्य हरगुडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.



