
(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)
अकोळनेर – सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा पंचायत संसाधन केंद्र, अकोळनेर येथे ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी व मान्यवरांनी आपल्या आईच्या नावे प्रेमाने वृक्षदान करत सुमारे २० वर्षे वयाच्या १० देशी वृक्षांची लागवड व पूजन केले. या उपक्रमातून आईप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि जिव्हाळा व्यक्त करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमास जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा नियोजन अधिकारी दिपक दातीर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्रकल्प अधिकारी (DRDA) मंजुषा ठवकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध खातेप्रमुख व ग्रामपंचायत चे माजी सरपंच प्रतिक शेळके उपस्थित होते.
जिल्हा पंचायत संसाधन केंद्राचे प्राचार्य तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जिल्हा पंचायत संसाधन केंद्राची पाहणी केली.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून जिल्हा पंचायत संसाधन केंद्रामध्ये करण्यात येत असलेल्या निवासी खोल्यांच्या बांधकामाची पाहणी यावेळी करण्यात आली. तसेच, नागरी सुविधांसाठी विशेष अनुदानांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी पंकज आशिया व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्ह्यात साकारण्यात आलेले हे स्वयंपूर्ण अंतर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षण केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकासासाठी महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध विभागांनी या प्रशिक्षण केंद्राचा अधिकाधिक उपयोग करून प्रशिक्षणांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी यावेळी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी प्रशिक्षण केंद्राची सद्यस्थिती तसेच भविष्यातील विकासाची दिशा याबाबत उपस्थितांना माहिती दिली. प्रशिक्षणार्थी व अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज संगणक कक्ष व वाचनालय तयार करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासोबतच ज्ञानवर्धक व प्रेरणादायी वातावरण मिळावे, यासाठी प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात पार्क विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्कमध्ये प्रशिक्षणार्थींना विविध विषयांची माहिती मिळावी, यासाठी विविध प्रकारचे मॉडेल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यातील एक आदर्श प्रशिक्षण केंद्र म्हणून हे केंद्र विकसित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या स्वयंपूर्ण अंतर्गत क्षमता बांधणी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ज्ञान, कौशल्य व कार्यक्षमता विकासाला चालना मिळणार असून, प्रशासन अधिक कार्यक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यास निश्चितच मदत होणार आहे.



