अहिल्यानगर जिल्हाधार्मिक

ज्योत एकरुखेला पोहोचेपर्यंत पाऊस पडावा- डॉ. सुजय विखे पाटील

जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ; डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

जाफना (श्रीलंका)- नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र इंद्राक्षी माता, जाफना (श्रीलंका) ते श्री वज्रेश्वरी माता, श्री क्षेत्र एकरुखे-शिर्डी (महाराष्ट्र) या भव्य मशाल ज्योत पदयात्रेच्या ‘शक्तीज्योत’ यात्रेला प्रारंभ झाला आहे. श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठान, एकरुखे यांच्या वतीने गेल्या २२ वर्षांपासून ही धार्मिक परंपरा सुरू आहे. यंदाची यात्रा दि. २७ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

 

जाफना येथील श्री इंद्राक्षी माता मंदिरात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते शक्तीज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी श्री वज्रेश्वरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवेंद्र भवर पाटील यांच्यासह प्रतिष्ठानचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीलंकेतील पवित्र स्थळापासून प्रज्वलित करण्यात आलेली ही शक्तीज्योत पदयात्रेद्वारे महाराष्ट्रातील श्री क्षेत्र एकरुखे-शिर्डी येथील श्री वज्रेश्वरी मातेच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे.

 

श्री इंद्राक्षी माता, जाफना-श्रीलंका हे देवी उपासनेच्या परंपरेतील पवित्र स्थान मानले जाते. जाफना परिसरातील नैनातिवु बेटावरील नागपूषणी अम्मन मंदिराशी इंद्राक्षी देवीची परंपरा जोडली जाते. श्रीलंकेतील देवी उपासनेच्या परंपरेत या स्थानाला विशेष धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. नवरात्रीच्या काळात आदिशक्तीच्या विविध स्वरूपांची आराधना केली जात असताना, श्री इंद्राक्षी मातेची उपासना ही शक्ती, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते.

 

‘ज्योत एकरुखेला पोहोचेपर्यंत पाऊस पडावा’

यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, या यात्रेचा संकल्प आमचा आहे. ही ज्योत एकरुखे येथे पोहोचेपर्यंत पाऊस पडावा, ही आमची भावना आहे. साईबाबांचा आणि श्री वज्रेश्वरी मातेचा आशीर्वाद या सर्व युवकांवर सदैव राहो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

श्रीलंका ते राहाता असा या युवकांचा प्रवास असून, तो आनंदात आणि निर्विघ्नपणे पूर्ण व्हावा, यासाठी विखे पाटील परिवाराच्या वतीने त्यांनी सर्व युवकांना शुभेच्छा दिल्या. या यात्रेच्या माध्यमातून युवकांनी धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देत अशा परंपरा पुढेही जपाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.श्रीलंकेला येण्याचा योग अनेकांना आला आणि मलाही हा योग मिळाला, याचा आनंद आहे. या संपूर्ण यात्रेसाठी सर्व युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा,असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

 

श्रीलंकेतील जाफना येथून सुरू झालेली ही शक्तीज्योत यात्रा महाराष्ट्रातील श्री क्षेत्र एकरुखे-शिर्डी येथे पोहोचणार आहे. गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेल्या या यात्रेच्या माध्यमातून श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक एकात्मतेची परंपरा जपली जात आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!