अहिल्यानगर जिल्हाराहुरी तालुका

डॉ. तनपुरे कारखान्याची ६९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत

प्रसादनगर येथील परस्पर विक्री झालेल्या जमिनीचा प्रश्न पुन्हा गाजला 

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

राहुरी – तालुक्यातील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये चेअरमन अरुणराव तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ व सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे या विषयावर चर्चा करताना सभासद आप्पासाहेब ढूस यांनी प्रसादनगर आणि देवळाली प्रवरा येथील जमिनीचा मुद्दा सलग तिसऱ्या वर्षी लावून धरला.

 

प्रसादनगरची जमीन रहिवाशांना द्या – ढूस

ढूस म्हणाले, “राहुरी फॅक्टरी येथे प्रसादनगर भागात कारखान्याची गट नं. ५४२ अन्वये जमीन आहे. त्या जमिनीवर महाराष्ट्र शासनाने स्लम (झोपडपट्टी) घोषित केले आहे. नगरपरिषदेने तेथे रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईटसाठी शासकीय निधी खर्च केला असल्याने ती जमीन आता कारखान्याला मोकळी करता येणार नाही किंवा विक्रीही करता येणार नाही.”

 

त्यापेक्षा नगरपरिषदेच्या मध्यस्थीने तेथे प्रधानमंत्री आवास योजनेसारखी (PMAY-U 2.0) योजना राबवून केंद्र सरकारकडून त्या जागेचे पैसे कारखान्याला मिळवावेत आणि ती जागा तेथील रहिवाशांच्या नावावर करून द्यावी. यामुळे कारखान्याला जागेचे पैसे मिळतील आणि प्रसादनगरमधील लोकांना त्यांच्या हक्काची जागा मिळेल,” अशी मागणी त्यांनी केली.

 

कोट्यावधीच्या जमिनीची परस्पर विक्री, चौकशीची मागणी

दुसऱ्या मुद्द्यावर बोलताना ढूस म्हणाले, “आदरणीय प्रसादराव तनपुरे साहेब चेअरमन असताना नगर-मनमाड महामार्गालगत देवळाली प्रवरा हद्दीतील गट क्र. ८७७ मधील ५६ गुंठे खराबा क्षेत्र कारखान्याने गवळी नामक इसमाकडून खरेदी खताने खरेदी केले होते. त्यास ३३३६ व ३३३७ असे फेर पडले आहेत.”

 

“या गवळी यांना तीन मुली होत्या. दोन मुलींनी त्यांचा २५ गुंठे हिस्सा कारखान्याला विकला होता. राहिलेली चंद्रभागा हिचा हिस्सा विकणे बाकी होते. परंतु, कारखान्याने खरेदी केलेले ५६ गुंठे क्षेत्र चंद्रभागा ऐवजी चंद्रकला मुंढे नावाच्या महिलेने ७/१२ उताऱ्यावर खाडाखोड करून, म्हणजे चंद्रभागाचे चंद्रकला करून, बनावट महिला उभी करून परस्पर विकले आहे. आज बाजारभावाप्रमाणे कोट्यावधी रुपये किंमत असलेली ही जमीन कारखान्याला परत मिळवण्यासाठी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत व कारखान्याची मालमत्ता परत घ्यावी.”

 

या मागणीला सभासद भरत पेरणे यांनी अनुमोदन देत म्हटले की, “ढूस सलग तीन वर्षे हा प्रश्न पोटतिडकीने मांडत आहेत. सर्वांनी याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. रीतसर चौकशी करून पुढील सभेत सभासदांना माहिती द्यावी.”यावर अध्यक्षीय भाषणातून उत्तर देताना चेअरमन अरुणराव तनपुरे यांनी सदर जमिनीच्या कागदपत्र दुरुस्तीसाठी महसूल विभागाकडे कारखान्याने पत्रव्यवहार सुरू केला असल्याचे सांगितले.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!