महाराष्ट्रराजकीयसंगमनेर

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘सहमती एक्सप्रेस’ धावणार का?; संगमनेरात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक

थोरात-विखे एकाच मंचावर; गडाख, कोल्हे, काळे, जगताप, पाचपुते यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती; बिनविरोध निवडणुकीसाठी हालचालींना वेग

(अहिल्यानगर खबरबात न्यूज नेटवर्क)

 

संगमनेर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांची सर्वपक्षीय बैठक पार पडली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने लक्षात घेता जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘सहमती एक्सप्रेस’ धावणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संगमनेर येथे झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार हेमंत ओगले, आमदार विवेक कोल्हे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अक्षय कर्डिले, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते आणि प्रतापसिंह पाचपुते उपस्थित होते. आमदार मोनिका राजळे आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यास मोठा खर्च होण्याबरोबरच राजकीय संघर्षही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीवरील अनावश्यक खर्च टाळून जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २८ सप्टेंबरपासून सुरू झाली असून ५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर ७ ते २१ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा बँकेच्या २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या, तर चार जागांसाठी निवडणूक झाली होती. यंदाही अधिकाधिक जागा बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, विविध तालुक्यांमधील इच्छुकांची संख्या, राजकीय गटांचे प्रतिनिधित्व आणि जागावाटपाचा फॉर्म्युला यामुळे अंतिम सहमती साधणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.

दरम्यान, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीही दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर संगमनेर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमुळे बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेला वेग आला आहे. प्रमुख नेत्यांनी एकत्र येत सहमतीचा मार्ग स्वीकारण्याची भूमिका घेतल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र, बैठकीत बिनविरोध निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली असली तरी प्रत्यक्षात कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार, कोणत्या गटाला किती प्रतिनिधित्व मिळणार आणि इच्छुक उमेदवारांची समजूत कशी काढली जाणार, यावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. त्यामुळे जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर होणाऱ्या पुढील चर्चांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

संगमनेरातील या बैठकीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरणात वेगळे चित्र निर्माण झाले आहे. एकमेकांच्या विरोधात राजकारण करणारे विविध गट जिल्हा बँकेच्या मुद्द्यावर एकत्र आले असले तरी ही सहमती प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यापर्यंत टिकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे संगमनेरातून सुरू झालेली ‘सहमती एक्सप्रेस’ बिनविरोध निवडणुकीच्या अंतिम स्थानकापर्यंत पोहोचणार का, याकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर खबरबात

नमस्कार, दैनंदिन घटनांपासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा या विषयांवरील माहिती या पोर्टलद्वारे प्रसारित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तरी नव्याने सुरुवात झालेल्या 'अहिल्यानगर खबरबात' या अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टलला आपण नक्कीच पसंती दर्शवाल अशी आम्ही आशा बाळगतो...धन्यवाद... 🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!